Saturday, March 31, 2007

उजाडलं.......

कान्‍हाला goodnight करुन झोपायला आले खरी,पण झोपेचा पत्ताच नव्‍हता.मग जरा वेळ नेटवर भटकून,काहीबाही वाचून झालं. पत्ते खेळून झाले,तरीही झोप गायब! मग गच्‍चीत गेले.जरा तरातरा चालले.मग खुर्ची टाकून शांत बसून राहिले.
खाली गेटशी वाचमनकाका,नि वर मी....दोघेही ह्‍यांचीच वाट पहात....
आज नवनाथ आणि मराठे बरोबर डिनरला गेले होते. आणखीन कुणी तिसरा होता हे रात्रीच्‍या बरळण्‍यातून समजलं.
आज प्रथमच,कुणाबरोबर आणि कुठे हे दोन्‍ही मला माहीत नव्‍हतं..
आजकाल,factory मधून वा factory-related कुणी येणं,म्‍हणजे मला संकट वाटतं, कारण त्‍या भेटीनंतर,त्‍यांचा नि पर्यायाने घराचाच मूड बिघडतो.
मला चाहूलच लागते जशी..
रिटायर होउन पाच महिने झाले.त्‍याआधी वर्षभर ते रिटायरमेंटचीच तर वाट बघत होते.तेव्‍हां सोडायची चा धोशा घेऊन, मला पुढच्‍या सहजीवनाची स्‍वप्‍ने दाखवणारे ते,आजसुध्‍दा तसेच अस्‍वस्‍थ,अस्‍थिर आहेत.आणि विनाकारण माझ्‍या मनाचा डोहही ढवळून काढीत आहेत.....
........ते अडखळत आत आले....anyway ,गाडी मात्र नीट चालवतात,नेहमीच..(तशी कधी ठोकलीही आहे)
तरीही मी सवयीने विचरलं,नीट आणलीत ना गाडी?.....
क्‍या यार,गाडीची जास्‍त काळजी,माझ्‍यापेक्षा !!
फारसं मनावर न घेता त्‍यांच्‍यापाठोपाठ वर निघाले...
सुषा,प्‍लीज,काहीतरी soothing हवं आहे... ... (हं,मला येताना पाह्‍यलंच नव्‍हत्त त्‍यांनी)
वर गेल्‍यागेल्‍या धाडकन्‌ बेडवर आडवे...चपला काढून घेतल्‍या.कपडे बदलून,थंड पाणी दिलं...मग,
........सुषा,आज मला कळलं..ज्ञानेश्‍वराला जे त्‍याच्‍या वयाच्‍या २१ व्‍या वर्षी कळलं,ते मला,आज ५८ व्‍या वर्षी समजतंय.त्‍याने समाधी घेतली,तेच बरोबर केलं.Samadhi is the right solution........
.म्‍हटलं,काय समजलंय तुम्‍हाला?...............
......सुषा,ज्ञानेश्‍वराचं ज्ञान,तत्वज्ञान,शहाणपण,त्‍याच्‍या values या कशाकश्‍शाला समाजात तेव्‍हां जागाच नव्‍हती. ज्ञानेश्‍वराला,नि त्‍याच्‍या भावंडानाही नव्‍हती.....म्‍हणून तर लहान वयातच संपले सारे...सारेजण !!
...म्‍हंटलं,नाही कसं? ज्ञानेश्‍वरीचा अभ्‍यास तर जगात सगळीकडे होतोय..त्‍याच्‍या values आजही टिकून आहेत.. ....
अगं पण,ज्ञानेश्‍वर कुठे राहिला? त्‍या पोराला तर,जगणं हराम करून टाकलं,त्‍या संस्‍कृतीरक्षकांनी..socalled ब्राह्‍मण पंडितांनी...... yes, त्‍याने समाधी घेतली,हेच बरोबर केलं......आजही,चागला माणूस,त्‍याचं चांगलं वागणं,चांगलं बोलणं,चांगले हेतू,त्‍याच्‍या values , काही नकोच आहे समाजाला ....ज्‍यांना त्‍या values समजत नाहीत,चांगुलपण नको आहे,अशी माणसे मस्‍त मजा करतात.आणि चांगली माणसं समाधी घेतात,संपून जातात..............
जाऊ दे ना सुधा...मला सांग,मराठेने घेतली का?
हँ..तो कुठे घेतो?
(हो ना,अगदी उमदा,निर्व्‍यसनी तरुण आहे तो !!)
....नवनाथ?........हो म्‍हटलं की नाही,ते काही कळलं नाही..........
म्‍हटलं,मग काय,तुम्‍ही एकटेच पीत बसलात??.....नाही अगं..तो.........
ohh , तेव्‍हां समजलं की आणखी कुणी होता..कोण होता,का होता?..माहीत नाही..
आतापर्यंत सांगत आल्‍येत...पुढचं काही माहीत नाही............
सुषा,माझं प्रयोजन संपलंय या जगातलं......माझे सद्‍हेतु,माझ्‍या values, सगळं,मी माझ्‍याच हातांनी गाडून टाकणार आहे,नि मग मीही............
म्‍हटलं,जाऊ दे ना रे सुधा..तू झोप बघू शांत....
मग,त्‍याच्‍या डोळ्‍यांवर,कपाळावर जरा हात फिरवला,पांघरुण घातलं,
तर माझा हात घट्‍ट धरूनठेवलान्‌....... सुषा,खरंच कंटाळलोय गं मी...........
हा कंटाळा शब्‍द ऐकून,मला खरंतर चांगलाच राग आला...होतंय काय याला असं कंटाळायला? एवढं कसलं frustration? कसला राग?..ठीक आहे,factory साठी कष्‍ट उपसले,जीव ओतला...पण,आता काय त्‍याचं?? आप मरें,जग डूबें.......कंपनीने मानमरातब,पैसा ही खूप दिला,यश दिलं...
आता तिच्‍यापासून dettach व्‍हायला नको का?आज कंपनीची घसरण चालू आहे.मालकाकडे पैसा आहे,पण capacity च्‍या ५० टक्‍केही उत्‍पादन नाही .caterpillar ची पूर्ण order हातातून गेली, जी मिळवण्‍यासाठी तू एक वर्ष अमाप धडपड केली होतीस.....हातात orders च कमी आहेत.. साधं scrap साडेतीनशे टनांवरुन शंभर टनांच्‍या आत आलं....
जाउ दे ना..आता गेली ती Raymonds च्‍या घशात...!! नाही वाचवू शकलास ना? २५ कोटी नाही उभे करु शकलास ना?..कारणे काहीही असोत....तुझेच इतक्‍या वर्षांचे सहकारी जर guarantee देत नव्‍हते,तुझ्‍यावर शंभर टक्‍के विश्‍वास टाकत नव्‍हते....तर,एकटा तू काय करणार होतास?....
.......हे माझे नेहमीचे प्रश्‍नही,आणि त्‍यांची उत्तरेही तुला ठाऊक आहेत ना?....
मुकाट्‍याने खाली येऊन झोपले..याच वादळात सकाळ झाली...त्‍यांना उठवलंच नाही.......
पण,चहाचा वास नाकात शिरताच स्‍वारी लगेच उठून,खाली आली,
आणि मग एकदमच उजाडलं........नेहमीसारखं.........!!