Tuesday, October 9, 2007

अन्‍नदान...

परवा गंगेच्‍या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्‍याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्‍नदान येथे करता येईल.राईसप्‍लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्‍या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्‍या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्‍की करून...आज बरोब्‍बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्‍वच्‍छ स्‍वयंपाकघर,स्‍वच्‍छ भांडी,स्‍वच्‍छ टेबलं..त्‍याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्‍यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्‍या पातेल्‍यामध्‍ये बटाट्‍याचा रस्‍सा, ३ मोठी भांडी भरून पुर्‍या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्‍न अगदी स्‍वच्‍छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्‍यांकडे नि आमच्‍याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्‍या सावरत भोवती फिरत होत्‍या.नदीवरही स्‍नाने करणार्‍यांची, कपडे धुणार्‍या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्‍या गोदाघाटावर नेहमीच फिरस्‍ते,प्रवासी,भिकारी यांची गर्दी असते.क्रियाकर्मे, अस्‍थि-विसर्जन करणारी माणसे बोडक्‍या डोक्‍यांनी फिरत असतात, स्‍नाने करत असतात. बाया तशाच उघड्‍यावर आंघोळी, कपडे आटपत असतात.त्‍यांच्‍यातल्‍याही काही टेबलाकडे लक्ष ठेवून होत्‍या.मोहमाया सोडलेले so-called भगवे साधूही कोंडाळे करून इकडेच बघत होते. हातात कमंडलू, कडीचे डबे होते. खाणावळवाल्‍यांची व्‍यवस्‍था झाल्‍यावर,वाढायचा हाकारा केल्‍यावर,एकच झुंबड उडाली.आधी त्‍यांनी मला सगळ्‍या भांड्‍यांना हात लावायला सांगितले.२ पुर्‍या,त्‍यावर भाजी व लाडू असे माझ्‍या हातात देऊन,नदीत सोडून यायला सांगितले. मी निघाल्‍यावर एक पोरगा मला गाइड करायला माझ्‍या बरोबर आला..सोडा ना,जाईल ते पाण्‍यात;आता नमस्‍कार करा.....
नमस्‍कार करून, परत टेबलाकडे आलो,तोवर वाढायला सुरवात झालीच होती.पोरे मला-मला करत होती,धक्‍का-बुक्‍की करत होती.मोठी माणसे जरा मागे होती.म्‍हातार्‍या बाया एकीकडे,भिंतीशी उभ्‍या होत्‍या.साधूंचे कोंडाळेही अधीर झाले होते.सर्वांच्‍या नजरेत तीच ती आदिम भूक,जी माणसाला पोटासाठी काहीही करायला लावते. बरेवाईट वागायला भाग पाडते; लाज-संकोचही नष्‍ट करते, ती भूक! गोळाभर अन्‍नासाठी इतकी अजिजी,हातघाई करणारी ती माणसे बघून माझ्‍या पोटात कालवलं अगदी! रडू यायला लागलं.डोळे घळाघळा वाहू लागले. इतकं अन्‍न, इतकी मुलेमाणसे बघूनही खूप अपुरं-अपुरंसं वाटायला लागलं.कोण आम्‍ही? कितीसं अन्‍न?कुणाकुणाला पुरे पडणार ते?कशी भागणार भूक?ह्‍यांचीही स्‍थिती काही वेगळी नव्‍हती.आधी आम्‍ही विचार केला होता की,आपण बनवून आणू व आपल्‍या हातांनी वाढू,असं. पण आता बघत होतो की, हे असं वाढणं नि इतक्‍या लोकांना हाताळणं आम्‍हांला जमलं नसतंच! आमच्‍याने तर हे बघवलंही जात नव्‍हतं..आम्‍ही असाही विचार केला होता की, आपण त्‍यातलीच पुरीभाजी खाऊन घेऊ,प्रसाद म्‍हणून..म्‍हणून बाईंना दुपारी स्‍वयंपाकाला नको असं सांगितलं होतं;पण, तिथे खाणंही आम्‍हांला शक्‍य वाटत नव्‍हतं.बघता बघता अन्‍न संपत आलं.माणसंही आटोक्‍यात आली होती.पोरं हात रिकामे करून,पुन:पुन: मागायला येत होती.४/५ साधू तिथेच घोटाळत होते. मग ह्‍यांनी हिशेब चुकता केला व आम्‍ही निघालो.साधू खिडकीजवळ आले; खाना दिया,लेकिन दक्षना किधर मिली?..झालं..ह्‍यांना उखडायला वेळ लागणार नव्‍हता. पटकन्‌ पर्समधून ४०/५० रुपये काढून दिले नि निघालो, भरल्‍या मनाने,वाहत्‍या डोळ्‍यांनी आणि रिकाम्‍या पोटांनी.......

Monday, September 24, 2007

प्राण्‍यांवरचे प्रेम?..

नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्‍हांला बंटीने गाठले.मोठ्‍या खुशीने अंगावर उड्‍या-बिड्‍या मारुन त्‍याने आपला आनंद व्‍यक्‍त केला,नि आमच्‍याबरोबर walk ला येण्‍याचे जाहीर केले; नव्‍हे, आमच्‍यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्‍या पाठककाकांचा कुत्रा. आता त्‍याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्‍या गल्‍लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्‍या-गेल्‍यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्‍लीत कोणी आलेले खपत नाही त्‍याला मुळीच! आमच्‍याबरोबर चालताना,मस्‍त शानमध्‍ये चालतो.वाटेत येणार्‍या लहानमोठ्‍या कुत्र्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्‍या अध्‍यात-मध्‍यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्‍ही पाथर्डी फाट्‍याच्‍या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्‍या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्‍थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्‍या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्‍हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवणार्‍यांच्‍या हातात एखादी छडी नाहीतर फांटी असायची,त्‍याने कुठे तोंड लावू नये,वा साखळीला ओढ देऊ नये म्‍हणून; पण इथे तर चांगला दंडा होता, आणि.... आणि काय होतय हे कळायच्‍या आत, त्‍या माणसाने कच्‌कन तो दंडा बंटीच्‍या पाठीत हाणला.. आईईग्‍ग.. बंटीबरोबरच मीही कळवळले. खरंतर बंटी अगदी सरळसोट चालत होता; खोडीही काढली नव्‍हती. त्‍याला इतक्‍या जोराने मारायचे काहीच कारण नव्‍हते. मी तर चांगलीच खवळले.
त्‍यांना म्‍हणाले,'वा: वा...हा चांगला न्‍याय आहे.स्‍वत:च्‍या कुत्‌र्‍यावर एवढं प्रेम करता,आणि तशाच दुसर्‍या कुत्‌र्‍याला इतक्‍या जोरात मारूच कसे शकता तुम्‍ही??काय हा राक्षसीपणा?'
तो;- 'ओ बाई,तो चावला असता ना ह्‍याला..'
मी;- 'अजिबात चावला नसता.तो सरळ चालत होता..का मारलंत त्‍याला उगीच?'
तो;- 'ओ..मग सुट्‍टा कुत्रा घेऊन कशाला फिरता? घरी ठेवा ना...'
मी;- 'मग तुम्‍हीच ठेवा ना तुमचा कुत्रा घरी, एवढी त्‍याला चावायची भीती वाटते तर!! कुत्‍र्‍याच्‍या प्रेमाचं एवढं प्रदर्शन करता.. तर हे तुमचं प्रेम झालं का? राक्षस कुठले! काही माणुसकी आहे की नाही?'
मग तो आणि मी..संतापात व्‍हायची तेवढी सगळी तूतू-मीमी झाली....हेही मग मोठा आवाज काढून माझ्‍या मदतीला धावले....मग,समोरून येणार्‍या एका काकांच्‍या जोडीने,'जाऊ दे हो,नका रागावू इतके'असे आम्‍हांला चुचकारले.. मग परत आम्‍ही तिघे पुढे चालू लागलो.संतापाने घामाघूम झालो होतो अगदी;डोळेही भरून आले होते.मनात प्रश्‍नांचा कल्‍लोळ ही उठला होता.....
- या म्‍हातार्‍याने दाखवलेले हे प्रेम?? हे कसले प्रेम?..
- पाळीव प्राण्‍याच्‍या गळ्‍यात साखळी घालून,त्‍याला बंधनात ठेवणे,हे प्रेम??..
- जो प्राणी त्‍या म्‍हातार्‍याचा पाळीव प्राणी आहे,तशाच दुसर्‍या प्राण्‍याला तो इतक्‍या जोरात मारू शकतो,हे प्रेम??
- आणि शेवटी, कुणी जर चूक दाखवली, तर त्‍याला उलट बोलून अपमानित करणे, हे प्रेम??
- कुत्‌र्‍यांच्‍या सारखीच माणसेही पिसाळायला लागली आहेत का हल्‍ली??.......

Sunday, August 19, 2007

राज कपूर..

लोकसत्‍ता वाचत होते.निळ्‍या डोळ्‍यांचा राजपुत्र अशा शीर्षकाखाली राज कपूरच्‍या चित्रपटांचा महोत्‍सव झी सिनेमा साजरा करणार असल्‍याची बातमी होती.ह्‍यांना सांगितल,तर म्‍हणाले, वाच ना सगळं मोठ्‍याने,....
"त्‍याच्‍या निळ्‍या डोळ्‍यात कायम स्‍वप्‍नं तरळत असायची.कपाळावर आलेले बेफिकीर केस,तोंडात सिगरेट आणि डोळ्‍यात जादूभरली निळाई घेऊन तो त्‍याच्‍या स्‍टुडिओत तासन्‌तास काम करायचा.राजस वर्ण,प्रभावी व्‍यक्‍तिमत्‍व, मधाळ हसू आणि अथांग निळे डोळे असलेला हा जादुगार लोकांना स्‍वप्‍ननगरीत नेण्‍यासाठी भव्‍यदिव्‍य अस एक विश्‍व उभारण्‍यात गढलेला असायचा. मग त्‍या स्‍टुडिओतून त्‍याची स्‍वप्‍नं चित्रपटगृहांत झळकायची, ..आणि... आणि लोक हरखून जायचे...
जाने ना नजर,पह..पहचाने..ज..जिगर...द..दम..भर जो उ..उधर म..मु..मुँह फे....फेरे
तेवढयात हे म्‍हणाले, अगं,अशी काय अडखळते आहेस वाचताना... हो ना, मलाही काही उमजेना......
तर झालं असं की,या ओळी बिना चालीच्‍या कधी म्‍हटल्‍याच नाहीत.. कधी म्‍हणणंही शक्‍य नाही.....
जणू या शब्‍दांत सूर built-in च होते........बघा ना तुम्‍हीही वाचून!!

Saturday, August 18, 2007

surgery on trigger finger :-2

मला तर काही सुचतच नव्‍हतं.. काय झालं हे असं!! घसा शिथिल झाला होता, तो Anaesthesia मुळे नव्‍हता का? तिचं म्‍हणणं, smoking मुळे narrowing झालं आहे, किंवा स्‍वरयंत्रावर काही growth झाली आहे... ही emergency आहे ? की accident? की पाटील madam ची mistake ? दोघेही doctors तिला protect करताय्‌त का? local anaesthesia मध्‍ये operation करण्‍याचं ठरल असताना general anaesthesia का द्‍यावा लागला? मग तो देण्‍याआधी नळी का नाही घातली? संग्रामला फोन करुन
सर्व परिस्‍थिती सांगितली......तो दोन्‍ही doctors शी बोलला....... म्‍हणाला, आई , आपण हे सगळं त्‍यांना नाही बोलू शकत.....त्‍यांनी त्‍या परिस्‍थितीत योग्‍य तेच केलं असणार..
इतकेच सांगतो की, आपल्‍या नशिबाने बाबांचे फक्‍त दातांवर निभावले आहे!
त्‍याच्‍या आश्‍वासक शब्‍दांवर पूर्ण विश्‍वास टाकला,
आणि निश्‍चिंतपणे ह्‍यांची काळजी घ्‍यायला पुढे सरसावले.......

Friday, August 10, 2007

surgery on trigger finger :-1

सकाळी लवकर आवरुन,सात वाजता hospital ला पोचलो..case paper वगैरे सगळं वेळेत आटपून,sister ने सांगितलेल्‍या bed वर वाट पहात बसलो.. मग तास भराने, sister बोलवायला आली..चालतच हे तिच्‍या पाठोपाठ operation theatre मध्‍ये गेले.. मी बाहेर बाकावर बसून राहिले..पाउण तासाने, दरवाज्‍यातून stretcher बाहेर आले.. त्‍यावर हे होते.. बेशुध्‍द ... तोंडातून रक्‍त आले होते.. मी अगदी चक्रावले.. local aneasthecia मध्‍ये surgery करणार होते ना? मग हे बेशुध्‍द का?.. त्‍यांना bed वर ठेवले.. तोपर्यंत aneasthetist पाटील आणि Dr पानगवाणेही आलेच.. पाटील madam च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे एका पंजाच्‍या surgery नंतर ह्‍यांचा श्‍वास बंद झाला..त्‍यामुळे त्‍यांना oxygen देण्‍यासाठी घशात नळी घालावी लागली..
तर ती श्‍वासनलिकेत जाईना .. कारण घसा शिथिल आणि बंद झाला होता. life saving action म्‍हणून त्‍यांना जबरदस्‍तीने laringoscope तोंडात घुसवावा लागला.. तो बाहेर काढताना ह्‍यांचे समोरचे, वरचे दोन दात चक्‍क उलटे दाबले जाउन,ढिले झाले होते,नि त्‍यातून रक्‍त वहात होते......

Sunday, June 3, 2007

टोच..

वर्तमानपत्रांचा ढीग आणि चहा मी टेबलावर ठेवला.. हे काय, दोनच कप? सोनल उठली नाही का अजून? तिचा नंतर ठेवते, भय्‍या आल्‍यावर,ताज्‍या दुधाचा... चहा झाल्‍यावर तिला बोलवायला गेले तर, अमल जागाच होता.. तितक्‍यात सेलची रिग वाजली.मिनलचाच असणार! तिला चहा झाल्‍याची खूण करून, अमलला घेउन बाहेर आले. म्‍हंटलं.त्‍याचं औषधपाणी करून घेऊ या.. मग त्‍याला भूक लागेल, झोपही येईल.. एकीकडे सोनलसाठी कणेरी शिजत ठेवली; काल किती जोरदार पोटात दुखलं रात्री.. जरा हलकंच बरं!....सगळं झालं, तरी त्‍यांचं बोलणं सुरूच होत.... मलाच पोटात कासावीस झालं.. भूक लागली असेल पोरीला! चागलं गरम चहाबरोबर काही खाऊन घेतलं असतंन्‌ तर!! आता लगेच मावशीही येतील, आंघोळ घालायला..... याच घालमेलीत तीन-चारदा आतबाहेर झालं.. माझी अस्‍वस्‍थता तिच्‍याही लक्षात आलीच.. तरी बोलणं चालूच! शेवटी अमल झोपून गेला.. त्‍याला पाळण्‍यात ठेवण्‍यासाठी आत गेले, म्‍हंटलं, बघ, झोपून गेला तो, कंटाळून.... मग, बोलणं आवरतं घेऊन, वैतागून, ती करवादली, 'मग, काय म्‍हणायचंय तुला? मिनलशी बोलणं, ही काय चूक झाली का माझी?' आता काय सांगणार हिला? तिची नाही, पण त्‍याने फोन करताना विचारायला नको होतं का की, तिचं चहापाणी झालंय, की नाही? एवढा प्रेमाचा होता तर, त्‍याने तिला आधीच सांगायचं की, मी तासभर बोलणारेय; तुझं काय ते चहा-खाणं सगळं समोर घेऊन बस म्‍हणून! ही अशी situation काही आजच पहिल्‍यांदा आलेली नाही.. कित्तीवेळा झालंय असं! यांचं फोनवरचं बोलणं संपतच नाही.... मग बसली टेबलाशी, तो गारढोण चहा घेऊन!!
म्‍हणजे, हिची भूक कळून मला टोचलं.. त्‍याला तिची भूक कळली नाही, म्‍हणूनही मला टोचलं....
आणि, मला टोचलेलं तिला कळलंच नाही, म्‍हणूनही मलाच टोचल...काय रे दैवा !!

Thursday, May 31, 2007

क्षणात...

काल रात्री बाईंची सुटी होती.उराउर पण बरीच होती.काही वेगळं खावंसं वाटत होतं,पण खूप कामही करायचं नव्‍हतं..काल सकाळी अमलचं vaccination झाल होतं; त्‍याने दिवसभर उभं धरलं होतन्‌.. मग Mania करायचं ठरलं. म्‍हणजे लवकर खाणी उरकली असती, नि झटपट आवरलंही असतं; पण ते कुठून व्‍हायला? खाणी होताहोताच अमल उठला.त्‍याचं पिणं होईपर्यंतच मिनलचा फोन आला, नि काहीतरी चिडचिड झाली.मग अमलला खांदयावर घेऊन झोपवलं, नि पाळण्‍यात ठेवलं.तोवर,सोनलच्‍या पोटात जोरदार दुखायला लागलं.Gases असतीलसं वाटलं,म्‍हणून सुंठ,हिंगपूड तुपातून,गरम पाण्‍याबरोबर दिलं.पण तितकासा relief वाटेना.मग पोटालाही हिंग लावला.जरा वेळ बरं वाटलं,पण पुन्‍हां उफाळुन आल्‍यागत खूप दुखायला लागलं..सारखी उठत होती,बसत होती; आतून चैन नव्‍हतं..मला काही सुचेना, घरात काही औषध असल्‍याचंही आठवेना (खरंतर,कित्ती वर्षांत कुणाचं पोट बिघडलंच नव्‍हतं) बारा वाजत आले होते. मग संग्रामला फोन केला.त्‍याने सगळी विचारपूस करून दोन गोळयांची नावे सांगितली.पटकन्‌ ह्‍याना आणायला पाठवलं..पुढचा विचारही सुरू झाला की, अर्ध्‍या तासात नाही कमी झालं, तर Lifeline Hospital ला जायचं.. पण बरं,ती वेळ नाही आली!! गोळी घेताच पाचव्‍या मिनिटाला घोरायला लागली सोनल!!
मी अगदी चकितच झाले..आतापर्यंत नेहमी मी नि संग्राम वाद घालत आलोय..मी आयुर्वेदिक औषधे नि निसर्गोपचार यांच्‍या बाजूने, आणि तो Allopathy च्‍या..तो सांगत आलाय की Allopathy मध्‍ये जसे Magic Drugs आहेत, तसे आयुर्वेदात नाहीयेत. मी कधीच मान्‍य करत नसे, पण आज मात्र.... मान गये उस्‍ताद !!