Sunday, June 3, 2007

टोच..

वर्तमानपत्रांचा ढीग आणि चहा मी टेबलावर ठेवला.. हे काय, दोनच कप? सोनल उठली नाही का अजून? तिचा नंतर ठेवते, भय्‍या आल्‍यावर,ताज्‍या दुधाचा... चहा झाल्‍यावर तिला बोलवायला गेले तर, अमल जागाच होता.. तितक्‍यात सेलची रिग वाजली.मिनलचाच असणार! तिला चहा झाल्‍याची खूण करून, अमलला घेउन बाहेर आले. म्‍हंटलं.त्‍याचं औषधपाणी करून घेऊ या.. मग त्‍याला भूक लागेल, झोपही येईल.. एकीकडे सोनलसाठी कणेरी शिजत ठेवली; काल किती जोरदार पोटात दुखलं रात्री.. जरा हलकंच बरं!....सगळं झालं, तरी त्‍यांचं बोलणं सुरूच होत.... मलाच पोटात कासावीस झालं.. भूक लागली असेल पोरीला! चागलं गरम चहाबरोबर काही खाऊन घेतलं असतंन्‌ तर!! आता लगेच मावशीही येतील, आंघोळ घालायला..... याच घालमेलीत तीन-चारदा आतबाहेर झालं.. माझी अस्‍वस्‍थता तिच्‍याही लक्षात आलीच.. तरी बोलणं चालूच! शेवटी अमल झोपून गेला.. त्‍याला पाळण्‍यात ठेवण्‍यासाठी आत गेले, म्‍हंटलं, बघ, झोपून गेला तो, कंटाळून.... मग, बोलणं आवरतं घेऊन, वैतागून, ती करवादली, 'मग, काय म्‍हणायचंय तुला? मिनलशी बोलणं, ही काय चूक झाली का माझी?' आता काय सांगणार हिला? तिची नाही, पण त्‍याने फोन करताना विचारायला नको होतं का की, तिचं चहापाणी झालंय, की नाही? एवढा प्रेमाचा होता तर, त्‍याने तिला आधीच सांगायचं की, मी तासभर बोलणारेय; तुझं काय ते चहा-खाणं सगळं समोर घेऊन बस म्‍हणून! ही अशी situation काही आजच पहिल्‍यांदा आलेली नाही.. कित्तीवेळा झालंय असं! यांचं फोनवरचं बोलणं संपतच नाही.... मग बसली टेबलाशी, तो गारढोण चहा घेऊन!!
म्‍हणजे, हिची भूक कळून मला टोचलं.. त्‍याला तिची भूक कळली नाही, म्‍हणूनही मला टोचलं....
आणि, मला टोचलेलं तिला कळलंच नाही, म्‍हणूनही मलाच टोचल...काय रे दैवा !!